पुणे: दिवाळीतही नागरिकांच्या संरक्षणार्थ भाऊबिजेपासून दूर असणाऱ्या अग्निशामक दलातील जवानांसोबत Firefighters विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या आणि पुणेकरांच्या वतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने भाऊबीज साजरी करण्यात आली. या भगिनींनी जवानांचे औक्षण करून त्यांच्या कामाविषयीची कृतज्ञता व्यक्त केली अन् त्यांच्या कार्याला सलामही केला आहे. 24 तास आपले कर्तव्य बजावणाऱ्या या अग्निशामक दलातील जवानांचा यावेळी गौरवही करण्यात आला आहे.
भोई प्रतिष्ठानतर्फे आयोजन: नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि आगीसारख्या घटनांमध्ये आपल्या जीवाची बाजी लावून, नागरिकांच्या जीवाचे आणि मालमत्तेचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्याची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील भोई प्रतिष्ठानकडून सुरू आहे. यंदा देखील प्रतिष्ठानच्या वतीने अग्निशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली.
गेल्या 27 वर्षांपासून जवानांसोबत साजरी भाऊबीज: भोई प्रतिष्ठानच्यावतीने पुणे शहरातल्या गंजपेठमध्ये असलेल्या मुख्य अग्निशमन केंद्रात जाऊन जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. गेल्या 27 वर्षांपासून भोई प्रतिष्ठानच्या वतीने अग्निशामक दलातील जवानांच्या वतीने भाऊबीजचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यावेळी महिलांकडून जवानांना औक्षण करण्यात आले आहे.
जीवावर उदार होऊन काम करत: अग्निशमन दलाचे जवान प्रत्येक संकटामध्ये स्वात:चा जीव धोक्यात घालून आपल्या प्राणांचे रक्षण करतात. त्यामुळे एक दिवस त्यांचे आभार मानण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. अग्निशमन दलातील जवान हे समाजाच्या संरक्षणासाठी वेळोवेळी आपल्या जीवावर उदार होऊन काम करत असतात. सणाच्या काळात आपल्या कुटुंबापासून लांब राहून आपले कर्तव्य बजावत असतात. दिवाळीसारख्या सणाला देखील हे जवान आपल्या कुटुंबीयांसोबत नसतात. त्यामुळे गेल्या 27 वर्षांपासून या जवानांसोबत भाऊबीज साजरी करण्यात येत आहे.
भाऊबीज साजरी करत: आज अग्निशामक दलातील जवान हे देखील आमचे भाऊ असून त्यांचं देखील आज भाऊबीज निमित्त औक्षण करून त्यांच्या कामाविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहे. आज हेच जवान सणासुदीला देखील आपल कर्तव्य बजावत आहे. म्हणून आज आम्ही त्यांच्या बहिणी म्हणून त्यांचा औक्षण करून त्यांच्या बरोबर भाऊबीज साजरी करत आहोत, अस यावेळी उपस्थित महिलांनी सांगितले आहे.
आमच्या सख्ख्या बहिनीपेक्षा जास्त आदर: आज आम्हाला आमच्या सख्ख्या बहिनीपेक्षा जास्त आदर आमच्या या बहिणींचा असून आज जो आनंद आम्हाला होत आहे. ते आम्ही शब्दात सांगू शकत नाही, अशी भावना देखील यावेळी अग्निशामक दलातील जवानांनी व्यक्त केली आहे.