पुणे - आमच्या हाती सत्ता दिल्यास ३ महिन्यात सातबारा कोरा नाही केला, तर पवारांची औलाद सांगणार नाही असे अजित पवारांन विधानसभा निवडणुकीत म्हणाले होते. आता अजित पवारांकडे वित्त खाते आले आहे, त्यामुळे त्यांनी शेतकर्यांचा सातबारा कोरा करून ते आश्वासन पाळावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
राज्यात संपूर्ण कर्जमाफीसाठी तर आरसीईएफला विरोध म्हणून केंद्र सरकारच्या विरोधात ८ जानेवारीला संपूर्ण ग्रामीण भारत बंद पुकारला आहे. त्यामध्ये देशातील २६५ शेतकरी संघटना सहभागी होणार आहे. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना अग्रभागी राहणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. आमची भूमिका सातबारा कोरा करण्याबद्दलची आहे. महाविकास आघाडी मधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सर्वांनी मिळून कर्जमाफीचा शब्द पाळावा एवढेच म्हणणे आहे असे शेट्टी म्हणाले.
आत्ता जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी ही अतिशय तकलादू आहे. जयंत पाटील यांनी जाहीर केलेले ३१ हजार कोटी रुपये निकषाप्रमाणे कसे खर्च होतात हे पाटलांनी दाखवून द्यावे. माहितीप्रमाणे नॅशनल बँकेकडून शेतीसंदर्भात कर्जपुरवठा अतिशय कमी होतो. तर, जिल्हा बँकेकडूनच शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा अधिक प्रमाणात केला जातो. त्यामध्ये साधारणतः जिल्हा बँकांकडून पिक कर्ज अधिक वितरण केले जाते.
हेही वाचा - 'राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम अन् सुरक्षित करण्यावर भर देणार'
जिल्हा बँकांची माहिती घेतली असता राज्यातील केवळ पुणे जिल्हा बँकेची परिस्थिती त्यात बरी आहे. मात्र, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक या जिल्हा बँकांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. सरकारने दोन टप्प्यात कर्जमाफी दिल्यास आमची सहकार्यांची भूमिका असेल. मात्र, त्यासाठी कर्जमाफी देण्याची मानसिकता हवी. त्यामुळे, सरकारने पहिल्या टप्प्यात सरसकट पीक कर्ज माफ करावे. तर, दुसर्या टप्प्यात दीर्घ मुदतीचे कर्ज माफी करावे. अशा दोन टप्प्यात कर्जमाफी करावी पण, शेतकऱ्यांची फसवणूक करू नका असे यावेळी ते बोलताना म्हणाले.
हेही वाचा - पुण्यात JNU हिंसाचाराचा निषेध, FTII मध्ये विद्यार्थ्यांची घोषणाबाजी