बारामती- (पुणे) बारामती शहर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून २० लाख रुपये किंमतीच्या १८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आंतरजिल्हा दुचाकी चोरी करणाऱ्या या टोळीमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मागील अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू असताना ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी योगेश विलास चिरमे (वय,२३.रा. झारगडवाडी ता.बारामती), गजानन दत्तू चव्हाण, निलेश उर्फ सोन्या उर्फ चिलम उर्फ उदय मोहन शेवगन,( दोघे,रा. अकोली वडगाव ता, गंगापूर जि.औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींची नावे आहेत.
असा लावला गुन्ह्याचा छडा-
या घटनेची हकीकत अशी की, दिनांक ३० मार्च रोजी पहाटे बारामती शहरातील दत्तनगर कसबा येथील प्रथमेश आपारमेंटच्या पार्किंगमधून एक दुचाकी ( एम.एच ११ सी.व्ही ५७४१) चोरीस गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली. परिसरात पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुचाकी चोरून नेत असताना अस्पष्ट व लपवलेला चेहरा दिसून आला. तसेच तांत्रिक पुराव्याच्या आधारे माहिती मिळवली आणि सापळा रचून वरील तिघांना ताब्यात घेतले.
आरोपी योगेश चिरमे यास न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली. चिरमे यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी वरील गुन्ह्यातील दुचाकी ( एम.एच ११ सी.व्ही ५७४१) सह बारामती शहर, तालुका परिसर, फलटण, सासवड, दौंड अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून २० लाख रुपये किंमतीच्या १८ दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. आरोपींकडून या १८ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यांनी केली कामगिरी....
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी निकम, पोलीस कॉन्स्टेबल सुहास लाटणे, दशरथ इंगोले, तुषार चव्हाण, अकबर शेख, बंडू कोठे, अजित राऊत, सायबर शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते, चेतन पाटील, पोलीस हवालदार गोपाळ ओमासे, होमगार्ड वायकर, मेमाने, साळुंके यांनी केली.