बारामती - पुणे जिल्ह्यातील बारामतीतही कोरोनाने हाहाकार केला आहे. कोरोनामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यासंदर्भाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आज (6 मे) खासदार सुप्रिया सुळे यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत लसीकरण, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स व औषधांची उपलब्धता आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.
बारामती लोकसभा मतदारसंघाबरोबरच पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर केंद्रांची सध्याची स्थिती काय आहे? तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या, त्यांना मिळत असलेले उपचार आणि अन्य सुविधा, खाटांची उपलब्धता, ऑक्सिजनची सध्यस्थिती, रेमडेसिवीर आदी बाबींवर यावेळी सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली.
सुप्रिया सुळेंच्या सूचना
तसेच, 'जिल्ह्यात सुरू असलेली लसीकरण केंद्रे, त्याठिकाणी होत असलेली गर्दी पाहून योग्य नियोजन करा. त्यासाठी लाभार्थ्यांची आगाऊ नोंदणी करा. जादा गर्दी होऊ देऊ नका. केंद्रांवर येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची योग्य काळजी घ्या', अशा सूचनाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिल्या.
दरम्यान, या बैठकीला पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अन्य पदाधिकारी, सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
बारामतीत लॉकडाऊन
बारामतीमध्ये वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर 4 मे रोजीच्या मध्य रात्रीपासून सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार बारामतीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना कडकडीत बंद असून सर्व रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. टाळेबंदीच्या कठोर अंमलबजावणीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा - व्हेंटिलेटर ‘व्हेन सर्किट’ ठरणार कोविड रुग्णांना संजीवनी; बारामतीतील डॉक्टरांचे संशोधन
हेही वाचा - सकारात्मक! बारामतीतील ८७ वर्षांच्या आजींची कोरोनावर मात