पुणे - लॉकडाऊन काळात सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मात्र शिरूर तालुक्यात नियमांचे उल्लंघन करत बार सुरु ठेवणाऱ्या शिवसेना उपतालुका प्रमुखाच्या मालकीचा बार शिक्रापूर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने सील केला आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे लॉकडाऊन काळात नियमांचे पालन न करणाऱ्या व्यावसायिक व नागरिकांवर पोलीस व ग्रामपंचायत प्रशासन कारवाई करत आहे. शिक्रापूर मलठण फाटा परिसरात शिवसेना उपतालुका प्रमुख आण्णासाहेब उर्फ आनंदा दामोदर हजारे यांच्या मालकीचा त्रिमूर्ती बार आहे. त्याठिकाणी नागरिकांना दारू दिली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाली. त्यांनतर पोलीस निरीक्षक विनोद घुगे, पोलीस उपनिरीक्षक शिवदास खाडे, सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सुभाष खैरे, ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे, तलाठी अविनाश जाधव यांच्या पथकाने त्या ठिकाणची पाहणी केली. दरम्यान त्रिमूर्ती बारचे शटर उघडे असून आतमध्ये दोन व्यक्ती दारू खरेदी करत असल्याचे आढळले. यावेळी शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने दोन्ही व्यक्तींना कारवाईसाठी ताब्यात घेतले.
तसेच ठिकाणचा पंचनामा करत हा बार पुढील पंधरा दिवसांसाठी पूर्णपणे सील करण्यात आला. लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला.