पुणे - खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर, कुख्यात गुंड गजानन मारणे याने आपल्या साथीदारांसह गोंधळ घालत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी मारणेसह त्याच्या 9 साथीदारांना पुन्हा अटक केली होती. त्या सर्वांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यासाठी पोलीस आले होते, परंतु न्यायालयाने त्यांना घेऊन जाण्यास पोलिसांना नकार दिला.
गजानन मारणे, प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय 36), बापु श्रीमंत बागल (वय 34), आनंता ज्ञानोबा कदम (वय 37), गणेश नामदेव हुंडारे (39), रुपेश कृष्णराव मारणे (वय 38), सुनील नामदेव बनसोडे (वय 40) श्रीकांत संभाजी पवार (वय 34) आणि सचिन आप्पा ताकवले (वय 32) अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत.
दीडशे ते दोनशे जणांवर गुन्हा दाखल
तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर गजानन मारणे याने मुंबई-पुणे महामार्गावरून शेकडो समर्थकांसह अलिशान वाहनातून मिरवणूक काढली होती. त्याशिवाय कोथरूड परिसरातही फटाके वाजवून, जमाबंदी आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीर जमाव जमवून दहशतीचे वातावरण तयार केले होते. कोथरूड पोलीस ठाण्यात याप्रकरणी दीडशे ते दोनशे जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी गजानन मारणेसह 9 जणांना अटक केली होती.
चुकीचे कलम लावल्याचा युक्तीवाद
दरम्यान पोलिसांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडताना इतक्या मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन गजानन मारणे याने मिरवणूक काढली, यामागे काही वेगळा कट आहे का याचा तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. तर बचाव पक्षाच्या वकीलांनी या मागणीला विरोध करत पोलिसांनी चुकीचे कलम लावल्याचे सांगितले. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मारणेसह त्याच्या साथिदारांना जामीन मंजूर केला.
मिशा काढण्यासाठी पोलिसांचा दबाव
गजनान मारणे व त्याच्या साथीदारांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिसांनी कुणाला त्रास दिला का, असे विचारल्यानंतर प्रदीप कंदारे याने आमच्या मिशा काढण्यासाठी आणि टक्कल करण्यासाठी पोलिसांनी दबाव टकल्याचे म्हटले.