पुणे: राज्यात अत्यंत चुरशीच्या ठरत असलेल्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघात आज मतदान पार पडले. आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कसबा मतदार संघात 45.25 टक्के तर चिंचवड मतदार संघात 41.25 टक्के मतदान झाले. या पोटनिवडणूकीचा निकाल येत्या 2 मार्चला निकाल जाहीर होणार आहे.
पोटनिवडणूकीतील उमेदवार: पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीत भाजकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या पोटनिवडणूकीत दोघांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. तर चिंचवड मतदार संघात भाजपकडून अश्विनी जगताप यांना तर महाविकास आघाडीकडून नाना काटे यांना तर अपक्ष म्हणून राहुल कलाटे हे मैदानात होते. कसबा मतदार संघात दुहेरी लढत तर चिंचवड येथे तिहेरी लढत पाहायला मिळाली.
अनेक आरोप-प्रत्यारोप: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत राज्यातील आजी-माजी मंत्री यांच्या सभा, रॅली तसेच कॉर्नर मीटिंग घेण्यात आल्या होते. निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटचे मतदान होण्यापर्यंत दोन्ही पक्षाकडून आरोप प्रत्यारोप होत होते.
मतदान पार पडले: पुण्यातील अनेक नागरिकांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्याकडे कल दिसला मात्र दुपारनंतर मतदान संथ गतीने सुरु होतं. सकाळी कसबा मतदार संघातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यात ज्येष्ठ नागरिकांचा जास्त प्रमाणात सहभाग होता. सकाळी मतदानासारखे महत्वाचे काम आटपूनच दिवसाची सुरुवात करायची अशा भावना मतदारांनी व्यक्त केली होती.
सुरूवातीलाच नाराजी नाट्य: आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यानंतर सातत्याने कसबा पोट निवडणुकीत वेगवेगळे घटना पहायला मिळाल्या. सुरूवातीला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी बाबत झालेले नाराजी नाट्य त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये झालेले बंड हे देखील कसबा पोटनिडणुकीत बघायला मिळाले.
प्रचाराला नेत्यांची मांदियाळी: कसबा पोटनिवडणुकीत सुरूवातीपासूनच प्रचारात स्थानिक मुद्दे बाजूला आणि राज्य तसेच देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा प्रामुख्याने बघायला मिळाली. भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्री गिरीश महाजन तसेच स्थानिक खासदार गिरीश बापट तसेच सर्वच नेतेमंडळी प्रचारात पहायला मिळाले. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात देखील माजी मुख्यमंत्री व माजी मंत्री तसेच महाविकास आघाडीतील सर्वच नेते मंडळी यांचे प्रचारात सक्रिय सहभाग पाहायला मिळाले.
खासदार गिरीश बापटांचे महत्त्व: कसबा मतदारसंघ म्हटला की खासदार गिरीश बापट यांचे नाव घेतले जाते. कारण गेल्या पाचवेळा आमदार राहिलेले गिरीश बापट यांना कसब्यातील किंगमेकर असे म्हटले जाते. पण गेल्या काही महिन्यांपासून खासदार गिरीश बापट हे आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत बापट प्रचाराला येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेतेमंडळी असतील तसेच विरोधी पक्षातील नेते मंडळी असतील या सर्वच नेत्यांनी खासदार बापट यांची भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार दिलीप पाटील यांची भेट घेतली आणि दुसऱ्याच दिवशी बापट प्रचाराला आले. खासदार गिरीश बापट हेमंत रासने यांच्या प्रचाराला आल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली.
हेही वाचा: Kasba Bypoll : ऑक्सिजन सिलेंडरसह व्हीलचेअरवर येत खासदार गिरीश बापट यांनी बजावला मतदानाचा हक्क