बारामती - आज सबंध देशामध्ये जात-पात धर्माच्या नावाने समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आपण जातीपातीचा विचार न करता केवळ विकास, लोकांचा संसार, नव्या पिढीचे चित्र, आपला परिसर बदलायचा हे एकच काम नजरेसमोर ठेवा. चांगल्या कामाला साद द्या, असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Ncp Leader Sharad Pawar ) यांनी व्यक्त केले आहे.
इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात पवार बोलत ( Sharad Pawar In Indapur ) होते. यावेळी इंदापुरातील भाजपा कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय विभाग मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, आमदार यशवंत माने आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, काही कारखान्यांनी साखरेचे उत्पादन कमी करून इथेनॉलची निर्मिती करायची असे ठरवले आहे. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळता येते. आज तेलाच्या किंमती वाढत आहेत. व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती हा पर्याय काढला. इथेनॉलमुळे वाहने तर चालतीलच शिवाय लोकांना चार पैसे अधिक मिळू शकतील. तसेच, आज देशातून आपण जे इंधन आयात करत आहोत. त्याच्यातून परकीय चलन वाचले जाईल. इथेनॉल निर्मिती करून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे, असे आवाहनही शरद पवार यांनी केले आहे.
हेही वाचा - Supriya Sule On ED : ईडीने पवार साहेबांना नोटीस पाठवली अन् राज्यात सत्ता आली - सुप्रिया सुळे