बारामती- शेतीच्या बांधावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका जोडप्याने दुसऱ्या जोडप्याला लोखंडी रॉड आणि फावड्याने मारहाण केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे घडली. याप्रकरणी दोघा विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बापू भोसले, रेणुका संतोष भोसले( दोघे रा. बाभूळगाव ता.इंदापूर )अशी आरोपींची नावे आहेत तर तुषार प्रताप आसबे (वय ३०, वर्ष रा.बाभुळगाव ता. इंदापूर) आणि ज्योती आसबे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहे.
काय आहे नेमकी घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबर रोजी दुपारी फिर्यादी व त्याची पत्नी ज्योती आसबे हे दोघेजण त्यांच्या शेतात काम करत होते. दुपारी दोनच्या सुमारास संतोष भोसले, रेणुका भोसले हे तिथे आले. शेतीच्या बांधावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरून संतोष याने शिवीगाळ करत हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पोटरीवर, मनगटावर जोरात वार केला. तर रेणुका हिने तिच्या हातातील लाकडी दांड्याच्या फावड्याने फिर्यादीच्या मांडीवर मारले. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या पत्नीसही संतोष याने शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून तिथेच राहणारा फिर्यादीचा आतेभाऊ सचिन देवकर घटनास्थळी आला. तेव्हा भोसले पती-पत्नी तिथून निघून गेले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सचिन देवकर यांने फिर्यादी व त्याच्या पत्नीस उपचारासाठी इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. सदर घटनेचा अधिक तपास इंदापूर पोलीस करीत आहेत.