पुणे - आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये पाकिस्तानला पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या खटल्याची सुनावणी लष्करी न्यायालयाच्या ऐवजी नागरी न्यायालयांमध्ये होईल, अशी शक्यता मानवाधिकार कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ असिम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.
भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाच्या निकालाला आव्हान देताना काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. यामध्ये कुलभूषण जाधव यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या चार्टरनुसार कौन्सिलर अॅक्सेस द्यावे, तसेच त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळावी या मागण्यांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताचा युक्तिवाद ग्राह्य धरून पाकिस्तानला त्यांच्या न्यायालयाने दिलेल्या निकालाचा पुनर्विचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी पाकिस्तानने अहंकार बाळगणे योग्य नाही. पाकिस्तानने भारताबरोबर संवाद साधून कुलभूषण जाधव यांना थेट मुक्त करायला पाहिजे. मात्र, पाकिस्तान त्यांना मुक्त करेल, अशी चिन्हे सध्या दिसत नाहीत. त्यामुळे पाकिस्तान त्यांच्याविरुद्ध नागरी न्यायालयांमध्ये खटला चालवेल, अशी शक्यता असल्याचे असीम सरोदे म्हणाले.