मावळ (पुणे) - महाविकास आघाडीच्या नेत्यांची विसंगती पाहता महाराष्ट्रात केव्हाही निवडणूका लागू शकतात, असे भाकीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केले आहे. ते मावळ येथे भाजपाच्या स्थानिक मेळाव्यात बोलत होते. काँग्रेस पक्ष घोटाळेबाज, राष्ट्रवादी झोलबाज आणि शिवसेना दगाबाज असल्याची देखील जहरी टीका त्यांनी याठिकाणी केली.
आशिष शेलार म्हणाले, जेव्हाही मावळमध्ये विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा कमळ फुलेल. ज्या पद्धतीने तीन पक्षात आपापसात विसंवादाची रोज लढाई लागलेली आहे. तीन पक्षांमधील दोन पक्षांचे संकेत आमच्याकडे येत आहेत. या सगळ्यांचा अभ्यास केला तर अनुमान असा काढता येऊ शकतो की राज्यात निवडणूका केव्हाही लागू शकते, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, माजी गृहमंत्री वॉन्टेड आहे. मुंबईचे पोलीस कमिशनरही वॉन्टेड आहेत.
तर, जो मैं बोलता हुं वह करता हुं, और नहीं बोलता तो डेफिनेटली करता हुं...त्यामुळं माझ्या नादाला लागू नका असे म्हणत पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी लक्षात ठेवावं, असा इशारा देखील त्यांनी अजित पवार यांना दिला आहे. पुढे ते म्हणाले की, मावळ शेतकरी गोळीबारात तीन शेतकरी मारले गेले तर 185 गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचे काम फडणवीस सरकार केले आहे. ज्याने गोळ्या झाडल्या त्याला आज मुंबईमध्ये प्राईम पोस्टिंग दिली आहे. मावळ मधील शेतकऱ्यांचे खरे शत्रू कोण हे आज पुन्हा एकदा सांगायचे आहे, असे म्हणत शेलार यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.