पुणे : पायातील घुंगराचा आवाज, ढोलकीचा उत्साह, गवळणीची चाल आणि मुजरा सगळ्या गोष्टी आपल्या समोर दिसल्या की आठवण येते ती महाराष्ट्रातल्या लोककलेची म्हणजे तमाशाची. याच तमाशाची सुरुवात झाली ती पुण्यातल्या आर्यभूषण तमाशा थिएटर पासून. हे महाराष्ट्रातले पहिले थिएटर असेल जिथे कलावंताची राहायची खायची आणि कला सादर करायची जागा होती. अहमद तांबे यांनी शंभर वर्षांपूर्वी या थिएटरची स्थापना केली.
राज्य शासनाच्या पुरस्काराची मागणी : अशा या आर्यभूषण थिएटरने लोककलेचा आवाज सतत धगधगता ठेवला, थिएटरने महाराष्ट्राला आपली कला जागवण्यासाठी मदत केली. आज आर्यभूषणला खरी मदतीची गरज आहे. कारण आर्यभूषणला आधुनिक व्हायचे आहे. त्या परिस्थितीत आजही थिएटर ती सेवा पुरवत आहे. एवढ्या मोठ्या ऐतिहासिक वारसदार वास्तूला एखादा राज्य शासनाचा पुरस्कार द्यावा अशी भूमिका राहील तांबे यांनी व्यक्त केलेली आहे जे या थिएटर मालक आहेत.
आर्यभूषण तमाशा थिएटरची स्थापना 1923 : आर्यभूषण तमाशा थिएटरची स्थापना 1923 रोजी अहमद तांबे यांनी केली. 2023 ला आर्यभूषण तमाशा थिएटरला 100 वर्षे पूर्ण झाली. परंतु सद्यस्थितीत तमाशा कलावंतांच्या अनेक अडचणी असल्याचे देखील यावेळी कलावंतांनी माहिती दिली. आर्यभूषण तमाशा थिएटरमधील सद्यस्थितीत काय कलावंतांच्या अडचणी आहेत? याची माहिती रिहाल तांबे(राहुल तांबे) सांगताना असं म्हणतात की, या लोककलेच जतन आम्ही तांबे कुटुंबीय करत आहोत. परंतु आर्यभूषण थिएटर शंभर वर्ष झाले. त्याला एखादा पुरस्कार राज्य सरकारने द्यावा. इथल्या कलाकारांना सोयी सुविधा देण्यात यावा यासाठी काही मदत करता आली तर ती करावी.
सरकारने लक्ष देणे गरजेचे : या थिएटरमध्ये काम केलेल्या अनेक लोकांना मोठे पुरस्कार प्राप्त झाले. सुरेखा पुणेकर, अविठाबाई नारायणगावकर अशा अनेक दिग्गज लोकांनी इथे आपले कार्यक्रम सादर केले. त्याच ठिकाणी दादा कोंडके, निळू फुले, असे अनेक लोक इथे येऊन इथे राहून आपली कला दाखवून ते मोठे झाले. परंतु शंभर वर्षानंतर सुद्धा हे थिएटर पूर्वीच्या परिस्थितीमध्ये उभा आहे. परंतु आता याकडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग या इतिहासाच्या साक्षीदाराला दखल घेऊन हा वारसा जपण्याचे काम करेल,अशी अपेक्षा कलावंतांना आहे. इतका मोठा इतिहासाचा वारसा असणारी वास्तू आणि या वास्तूतून तयार झालेले लोक यांना उंच केले. परंतू त्या वास्तूला सुद्धा कुठेतरी छोटासा पुरस्कार भेटावा अशी अपेक्षा व्यवस्थापन बघणारे राहील तांबे यांनी व्यक्त केली आहे.
कठीण परिस्थितीतही थिएटर चालविले : 1993 पासून कै. अहमद तांबे आणि त्यानंतर त्यांची सर्व मुले आजपर्यंत या कठीण परिस्थितीतही हे थिएटर चालवित आहेत. आजही या ठिकाणी 200-250 तमाशा कलावंत आहेत. तसेच या थिएटरला फार मोठा राजकीय, सांस्कृतिक वारसा आहे. या थिएटरमध्ये आपली कला सादर केलेल्या कलावंतांची नावे पाहिली तर सध्याच्या तरुण पिढीला निश्चितच आश्चर्य वाटेल. यमुनाबाई वायकर या ६-७ वर्षे तेथे राहण्यास होत्या. त्यांना राष्ट्रपतींनी पद्मश्री पदक देऊन गौरविले होते. आर्यभूषणमध्ये तुकाराम खेडकर, तमाशा सम्राट काळू-बाळू यांचे फड कायम असत. भाऊ बापू मांग नारायणगावकर यांचा तमाशा फड आणि त्यात सहभाग घेणाऱ्या त्यांच्या 3 मुली विठाबाई, केशरबाई, मनोरमा यांनी या क्षेत्रात केलेली उत्तुंग प्रगती थक्क करणारी आहे. विठाबाईंना तर संगीत अकादमी पुरस्कार 2 वेळा प्राप्त झाले होते. तसेच राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते 1957मध्ये राष्ट्रपती पदक देऊन गौरविले होते.
तमाशाबंदीचा निर्णय : 1955-56 च्या काळात मोरारजी देसाई यांनी तमाशाबंदीचा निर्णय आणला होता. त्याला विरोध करण्यासाठी या थिएटरमध्ये परिषदा झाल्या. त्याला वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, ह. रा. महाजनी, राजाभाऊ थिटे एवढेच काय पु. ल. देशपांडे हेदेखील तेथे हजर होते. विशेष म्हणजे त्यांनी त्यावेळी हार्मोनियमवर ‘झाला महार पंढरीनाथ’ हे गीत सादर केले होते. दादू इंदुरीकर, तुकाराम खेडेकर, जगताप पाटील, निळू फुले, राम नगरकर येथे नियमित येत असत. उषा चव्हाण यांनी लहानपण येथे घालवले. अनंत माने यांच्या ‘सांगत्ये ऐका’ या गाजलेल्या चित्रपटातील सर्व महिला सहकलाकार याच थिएटरमधील होत्या. अशीही माहिती मिळते. पूर्वी चवली-पावली असे चलन होते. त्यावेळी येथील कार्यक्रमांना पावली म्हणजे सध्याचे २५ पैसे तिकीट होते. आता हेच तिकीट 50 रुपये झाले असल्याचे राहील तांबे यांनी सांगितले. आजही हे थिएटर फारशी सुधारणा न होता, आहे त्या स्थितीत अजूनही सुरू आहे. हे विशेष म्हणावे लागले.
कलावंतांनी अडचणी मांडल्या : एकीकडे तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. परंतु या लोककलेतील कलावंतांचा मात्र जीवनाचा संघर्ष संपताना दिसत नाही. कोरोना काळानंतर आता कुठे त्यांना थोडेसे कार्यक्रम भेटायला लागले आहेत. परंतु कोरोना काळात सुद्धा कलावंतांना कुठली मदत झाली नसल्याचे कलावंत सांगतात. आज आर्यभूषण थिएटरमध्ये आम्ही कार्यक्रम करत असताना, ही कला जिवंत ठेवत असताना अनेक अडचणी आहेत.आम्हाला प्रशिक्षक ठेवावे लागतील. नवीन कलाकार तयार करण्यासाठी वेगवेगळे क्लासेस घ्यावे लागतील. त्यासाठी लागणारा खर्च देखील खूप मोठा आहे. त्याकडे सुद्धा सरकारने लक्ष देण्याची गरज असल्यास हे कलावंत सांगतात. त्यामुळे महाराष्ट्राचा वारसा महाराष्ट्राची कला जिवंत ठेवण्यासाठी आर्यभूषण थिएटरमधले हे सर्व कलावंत यांच्या गरजा पूर्ण करणे ही सगळी आपल्या सरकारची आणि समाजाची सुद्धा जबाबदारी आहे.