पुणे - कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात आंबेगाव तालुक्यात हातावर पोट असणाऱ्या कुटुंबात चूलच पेटत नसल्याची परिस्थिती आहे. अशा ३ हजार कुटुंबांना अत्यावश्यक किराणा व इतर वस्तू तत्काळ पुरवठा उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील संस्थाच्या माध्यमातून आज मदत करण्यात आली. यावेळी पराग मिल्कचे डायरेक्ट देवेंद्र शहा यांनी या वस्तूंचे वितरण केले.
आंबेगाव तालुक्यातील गोरगरीब कुटुंबांतील व आदिवासी भागातील परिस्थिती गंभीर असताना या कुटुंबांना एक आठवडा पुरेल एवढा किराणा व इतर वस्तू आज मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. पुढील काळात या कुटुंबीयांचे पालकत्व स्वीकारण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढील काळात मदतीचा हात पुढे करण्याची गरज असल्याचे मत पराग उद्योग समूहाचे देवेंद्र शहा यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील तीन हजार कुटुंबीयांसाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, शरद सहकारी बँक लिमिटेड, पराग मिल्क फूड प्रायव्हेट लिमिटेड, मोरडे फुड्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती मंच, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ, पराग नागरी सहकारी पतसंस्था, वेस्टर्न हिल्स फूड प्रायव्हेट लिमिटेड, हॉटेल रविकिरण, जिल्हा परिषद सदस्य तुलसी भोर, दर्शन ट्रान्सपोर्ट नंदुशेठ सोनवले, कपाशी उद्योग समूह दीपक हिंगे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात तोंड वर काढत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नका, असे आवाहन उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसेपाटील यांनी केले आहे. प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढील काळात अनेक संस्था आपले पालकत्व स्वीकारतील व तालुक्यात एकही जण उपाशी झोपणार नाही असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.