पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये शनिवारी सकाळी दैनंदिन प्रशिक्षणादरम्यान एका परदेशी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली गेली होती. दरम्यान या घटनेची माहिती मालदीव दूतावासाला कळविण्यात आली आहे. याप्रकरणी लष्कराच्या न्यायालयाकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थी अचानक कोसळला -
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैता पूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद सुलतान इब्राहिम (21) राहणार मालदीव हा एनडीएच्या 145 व्या अभ्यासक्रमांसाठी आलेला विद्यार्थी होता. एनडीएमध्ये तो 21 मार्च 2021 पासून प्रशिक्षणासाठी दाखल झाला होता. सध्या त्याचा अभ्यासक्रमाचा दुसरा टप्पा सुरू होता. शनिवारी सकाळी एनडीएमधील प्रशिक्षणाच्या सरावातील एका उपक्रमात इब्राहिम नेहमीप्रमाणे सहभागी झाला होता. त्यावेळी तो जागेवर अचानक कोसळला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या मृत्यू मागील योग्य कारण कळण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन लष्कराच्या न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत, तसेच याप्रकरणी मालदीव दूतावासाला ही माहिती देण्यात आलेली आहे. या घटनेचा अहवाल पोलिसांना पाठवण्यात येणार आहे.
मृतदेह लष्करी सन्मानासह मालदीवला पाठविणार -
लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मालदीव दूतावासाशी चर्चा करून इब्राहिम यांचा मृतदेह लष्करी सन्मानासह मालदीवला पाठविण्यात येणार आहे.
हेही वाचा - अघोरी कृत्य.. वाईजवळ अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीत नेऊन पूजनाचा प्रकार, मांत्रिक फरार