पुणे - बारामती शहरात आणखी एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर रुग्ण हा बारामती शहरातील समर्थ नगर येथील असून त्या रुग्णाचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्याचा अनेकांशी संपर्क आला असल्याने इतरांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बारामतीतील नागरिकांनी बाहेर फिरू नये, घरातच राहावे. सर्वांनी मिळून पुढील काही कालावधीसाठी स्वतःहुन जनता कर्फ्यू लागू करून स्वतःहुन सहभागी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेे आहे.
बारामतीत काही दिवसांपूर्वीच एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्याची प्रकृती सुधारत असतानाच आज बारामती शहरात दुसरा एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे समर्थ नगर हे केंद्र धरुन 3 किमी परिसरात क्वारंटाइन झोन तर समर्थ नगर हेच केंद्र धरुन 5 किमी परिसर बफर झोन म्हणुन घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रात सर्व प्रकारची वाहतुक नियंत्रित करण्यात आली आहे.
क्वारंटाइन झोनच्या प्रत्येेक मुख्य रस्त्यावर चौकीची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथुन सर्व वाहने तपासणी करुन सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच त्या भागात आरोग्य विभागामार्फत सर्वे करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.