पुणे - क्राईम पेट्रोल मालिका बघून ३४ लाख रुपये लुटीचा बनाव रचणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा पाच ने अटक केली आहे. आरोपींना अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी जेरबंद केले आहे. कुणाल रवींद्र पवार (२०) आणि ओंकार भोगाडे (२१) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. लुटलेल्या पैशातून ते कर्ज फेडून उरलेल्या पैशात गोव्याला जाऊन मौजमजा करणार होते. मात्र, त्याअगोदर पोलिसांनी त्यांचे बिंग फोडले आहे.
कुणाल हा लॉजीकॅश कंपनीत कॅश जमा करण्याचे काम करत होता. त्याने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिवसभरात देहूरोड, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, भोसरी, येथून काही जणांकडून रोख रक्कम ३४ लाख ३९ हजार रुपये जमा केले होते. देहूरोड परिसरात मित्र ओंकारसोबत बनाव रचून पिस्तूलाचा धाक दाखवून जवळील रक्कम लुटून नेल्याचा बनाव रचला. घटनास्थळी देहूरोड पोलिसांनी येऊन भेट दिली. वरिष्ठ अधिकारीदेखील दाखल झाले होते. तपास सुरू केला. मात्र, ठोस पुरावा मिळत नव्हता. तपास सुरू असताना कुणालच्या बोलण्यात फरक जाणवला. तसेच मोबाईलच्या तांत्रिक तपासात विसंगती आढळल्या. अखेर पोलिसांनी खाक्या दाखवताच मित्रासह बनाव रचल्याची कबुली कुणालने दिली.
सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक नीलेश बोडखे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनीदेखील मदत केली.