पुणे - इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी येथील लक्ष्मण सतू डोईफोडे (वय ४५) यांना आसाम राज्यात कर्तव्यावर असताना वीरमरण आले. ही घटना २३ फेब्रुवारीला घडली. लक्ष्मण डोईफोडे हे सिग्नल रेजिमेंट आसाम या ठिकाणी सुभेदार या पदावर कार्यरत होते.
हेही वाचा - चिमुकल्यांनी केले हजारो देशी वृक्षांचे बी गोळा; बीज आणि सीड बॉल रोपणासाठी होणार फायदा
गस्त घालत असताना भारतीय जवानांची गाडी दरीत कोसळली. यामध्ये दोन जवानांना वीरमरण आले. त्यात लक्ष्मण डोईफोडे यांचा समावेश आहे. लक्ष्मण डोईफोडे यांच्या निधनाची माहिती कळताच बोराटवाडी गावासह इंदापूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण डोईफोडे हे २६ वर्षांपासून भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत होते. त्यांनी तीन वेळा सेवा वाढवून घेतली. ते दोन महिन्यांपूर्वीच आपल्या मूळगावी बोराटवाडीत सुट्टीवर आले होते. सुमारे २५ दिवस ते गावी होते. ड्युटीवर जाताना गावातील सर्व नागरिकांना ते भेटून गेले होते. डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.
डोईफोडे परिवारावर दु:खाचा डोंगर पसरला आहे. बोराटवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे. २६ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजता लक्ष्मण डोईफोडे यांचे पार्थिव बोराटवाडी येथे आणले जाणार आहे. त्यांच्यावर सकाळी ९ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालणारे कोरोना योद्धे झाले बेरोजगार!