पुणे - देशभरात करोनाच्या साथीमुळे 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे ऊसतोड मजूरांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. त्यांच्या मदतीला 'भिमाशंकर सहकारी साखर कारखाना' धावून आला आहे. कारखान्याने 6 हजार 500 ऊसतोड मजूरांना सुमारे 25 लाख रुपये किंमतीचा किराणा व भाजीपाला मोफत दिला आहे. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे यांच्या हस्ते या किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
सध्या राज्यभरात कोरोनाची दहशत असल्यामुळे सर्वत्र संचारबंदी आहे. त्यामुळे भिमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरातील 6 हजार 500 ऊसतोड मजूर कारखाना स्थळावरच वास्तव्यास आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना आपल्या गावी जात येत नाही. त्यामुळे या ऊसतोडणी मजूरांना कारखान्याच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.