पुणे - आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील एका खासगी रुग्णालयात सीलबंद आरएल (Ringer Lactate) कंपनीच्या सलाईनमध्ये चक्क शेवाळ आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सहा महिन्यापूर्वी याच कंपनीच्या साईनमध्ये मंचर उपजिल्हा रुग्णालयात शेवाळ निघाल्याची घटना घडली होती. त्यामुळे कंपनीने रुग्णाच्या जिवाशी चालवलेला हा खेळ लवकर थांबवा अन्यथा कंपनीवर बंदी घालण्यात येईल, असा इशारा आंबेगाव तालुका डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. संतोष शिंदे यांनी दिला आहे.
मंचर येथील एका खासगी रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु होते. त्यावेळी रुग्णाला सलाईन लावण्यासाठी बंद बॉक्समधून आरएल कंपनीचे सालईन बाहेर काढले. तेव्हा या सलाईनमध्ये शेवाळ असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या घटनेची आंबेगाव डॉक्टर संघटनेने गंभीर दखल घेऊन कंपनी व्यवस्थापनाला खडे बोल सुनावत पुढील काळात आरएल कंपनीचे सलाईन वापरण्यास बंदी घालण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सलाईन बनवणाऱ्या कंपन्यानी रूग्णांच्या आयुष्याशी खेळ मांडलाय की काय? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. मागील 6 महिन्यात मंचर शहरात सलाईनच्या बॉटलमध्ये शेवाळ आढळण्याची ही दुसरी घटना आहे. याबाबत आरोग्य विभागाने तातडीने याची दखल घेवून सबंधित प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सर्वसामान्य मंचर करांकडून होवू लागली आहे.