बारामती (पुणे) - राज्याच्या राजकारणात अजित पवार ( Ajit Pawar janta darbar in baramati ) हे एक महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. विविध क्षेत्रातील त्यांचे सखोल ज्ञान, त्यांची प्रशासनावरील असणारी पकड वाखाणण्या जोगी आहे. आपल्या मतदारसंघातील नागरिकांची विविध कामे व समस्यांचा निपटारा जागच्या जागेवर करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आपल्या मतदारसंघातील नागरिकांना त्यांची कामे घेऊन पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी यावे लागू नये म्हणून मागील अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत ( Ajit Pawar janta darbar ) जनता दरबार घेत असतात. मागील काही दिवस बंद असलेला जनता दरबार आज सुरू झाला असून, असंख्य नागरिक आपली कामे घेऊन जनता दरबारात दाखल झाली आहेत. याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा विशेष रिपोर्ट.
हेही वाचा - Ajit Pawar On Election : कोल्हापूर निवडणुकीत शिवसेनेने मनापासून काम केले अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार आज (रविवार दि.17) बारामती दौऱ्यावर आहेत. येथील विद्याप्रतिष्ठान येथे ते जनता दरबार घेत आहेत. कोरोना व अधिवेशनामुळे मागील काही दिवसांपासून हा जनता दरबार बंद ठेवण्यात आला होता. मात्र, आज तो पुन्हा भरवण्यात आला आहे. अजित पवारांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली.
शेवटच्या नागरिकाचे निवेदन घेईपर्यंत दरबार सुरू राहतो - शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच महिला, पुरुष व वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने आपली कामे घेऊन पवार यांच्या दरबारात येत असतात. आपल्या मतदारसंघातील लोकांना त्यांच्या कामासाठी पुणे - मुंबईत भेटायला येऊ लागू नये म्हणून अजित पवार स्वतः लोकांना भेटत असतात. यावेळी सर्व विभागातील शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित असतो. नागरिकांचे ज्या विभागाकडे काम आहे. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ते नागरिकांचे निवेदन देतात आणि तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश देत असतात. दरबारात येणाऱ्या शेवटच्या नागरिकाचे निवेदन घेऊन त्यावर कार्यवाही करेपर्यंत दरबार सुरू राहतो.
जागच्या जागेवर निपटारा - विशेष बाब म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यावेळी बारामती दौऱ्यावर असतात. त्यावेळी ते अनेक कार्यक्रम पार पाडत असतात. मात्र, यावेळी देखील अनेक नागरिक आपली कामे घेऊन पवार यांच्याकडे येत असतात. चालू कार्यक्रमातही प्रत्येकाचे निवेदन घेऊन स्वतः वाचून संबंधित अधिकाऱ्याला बोलून त्या निवेदनाचा निपटारा जागच्या जागेवर करतात.
म्हणून लाखोंच्या मतांनी होतो विजय - मतदारसंघातील अनेक नागरिक या जनता दरबाराला मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या जनता दरबारात विद्यार्थी, महिला, पुरुष, वयोवृद्ध, अपंग आदी आपली कामे घेऊन येतात. कामे तात्काळ होत असल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो. या जनता दरबारात आलेल्या प्रत्येक सामान्य नागरिकांची पवार आस्थेने विचारपूस करत असतात. म्हणून त्यांना प्रत्येक निवडणुकीवेळी प्रत्यक्ष प्रचाराला येण्याची गरज भासत नाही. उमेदवारी दाखल केल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ व प्रचाराची सांगता सभा घेतात. मतदारसंघातील प्रत्येक पदाधिकारी व सामान्य नागरिक स्वतः उमेदवार म्हणूनच अजित पवारांचा प्रचार करतात. म्हणूनच अजित पवार स्वतः प्रचाराला न उतरताही त्यांना लाखोंच्या मतांनी नागरिक निवडून देतात.
हेही वााच - Athavale says on JNU : कोणी नॉनव्हेज न खाण्याची भूमिका घेते तर चूक नाही - आठवले