पुणे - पक्षाच्या पडत्या काळात पक्षाला सोडून गेले त्यांना परत घेण्याच्या भानगडीत पडू नका, असा दम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. विधानसभेचे निकाल लागल्यानंतर झालेल्या सत्तानाट्यानंतर अजित पवारांनी प्रथमच पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. मंत्रिमंडळाबाबतचे सर्व निर्णय शरद पवार घेतील, असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
कुणा वाचून कुणाचे नडत नाही, असे म्हणत आता बाहेर गेलेल्यांना सहज प्रवेश नसल्याचे अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काही निर्णय घेतला, तर तो आपल्याला स्विकारावा लागेल, असेही ते म्हणाले. 'माझ्या बाबतीत पवार साहेब आणि जयंत पाटलांनी निर्णय घेतला म्हणून मी इथे उभा आहे', अशी टिप्पणीदेखील त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा - नागपुरातील 'देवगिरी' जयंत पाटील, की अजित पवारांचे करणार स्वागत?
अमोल मिटकरींना विधान परिषदेत संधी द्यावी यासाठी आपण आग्रही असल्याचेही अजित पवार म्हणाले आहेत. यावेळी अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्या, असा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. यावर अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री पद मीच घेणार आहे, असे म्हणताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, पक्षाकडून अधिकृत घोषणा होईपर्यंत तरी हेही एक गूढच राहणार आहे.
राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर
अजित पवारांनी यावेळी राज्याच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. राज्यावर पावणेपाच लाख कोटी कर्ज आहे, असे आपण म्हणत होतो. मात्र, प्रत्यक्षात ते कर्ज पावणे सात लाख कोटी असल्याचा गौप्यस्फोट पवार यांनी केला आहे. त्यासोबतच आधीच्या सरकारने हाती घेतलेले प्रकल्प केवळ विरोधासाठी बंद करणार नसल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले. त्या प्रकल्पांचा आढावा घेऊन मगच योग्य ते निर्णय घेतले जातील, असे पवार म्हणाले.