पुणे - छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्गत (सारथी) तारादूत प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी राज्यभरातील तारादुतांनी पुण्यातील सारथीच्या कार्यालयासमोर आजपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या तारादुतांनी आंदोलनाला उपस्थिती लावली. सरकारकडून फसवणूक झाल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
'महाविकास आघाडीच्या पदवीधर उमेदवारांना आम्ही निवडून दिले आहे. तरीही आमच्यावर अन्याय करणार का,' असा सवालही आक्रमक तारादुतांनी सारथीचे पालकत्व घेतलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आणि तारादुतांना न्याय देण्याची मागणी केली.
महिला सक्षमीकरणासह सामाजिक जाणीव जागृती उपक्रम राबविण्यासाठी सारथी संस्थेने तारादूत हा पथदर्शी प्रकल्प सुरू केला होता. त्यासाठी 480 तरुण-तरुणींची तारादूतपदी निवड करून त्यांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर त्यांना 18 हजार रुपयांचे मानधनही निश्चित करण्यात आले. मात्र, नियुक्त्या व मानधन रखडल्याने तारादुतांनी फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात सारथीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते.
मराठा क्रांती मोर्चाचा आंदोलनाला पाठिंबा -
उपोषणानंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तारादूत प्रकल्प सुरू राहील, अशी ग्वाही देण्यात आली. मात्र, सारथीच्या तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी 6 मार्च रोजी तारादूत प्रकल्पाला स्थगिती दिली. तसेच 27 मार्च रोजी तारादुतांना नोंदणीकृत बंधपत्र व सारथीचे ओळखपत्र जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही हा प्रकल्प सुरू न झाल्याने उद्विग्न झालेल्या तारादुतांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.