पुणे - सातारा-पुणे महामार्गावर पुण्याजवळी खेडशिवापूर येथील टोलनाक्यावर सर्वपक्षीय कृती समितीकडून टोल हटविण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. खेडशिवापूर येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील खेडशिवापूर टोलनाका हटविण्यासाठी टोलनाका हटाव कृती समितीकडून रविवारी सकाळपासून धरणे आंदोलन केले जात आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी) रात्रीपासून या मार्गावरील काही वाहतूक वेगवेगळ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाकर्त्यांशी चर्चा केली आहे.
हेही वाचा -
आळंदीत दारूभट्टी उद्ध्वस्त; उत्पादन शुल्कसह ग्रामस्थांची कारवाई
खेडशिवापूर येथील टोलनाका हटविण्याच्या मागणीसाठी टोलनाका हटाव कृती समितीकडून धरणे आंदोलन केले जात आहे. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वर वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये, याकरता कोल्हापूर बाजुकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक वेगवेगळ्या मार्गाने वळविण्यात आली आहे. या टोलनाक्यावर शनिवारी आणि रविवारी वाहतूक कोंडी सुटत नाही. या ठिकाणी वाहन व चालक तासंतास वाहतूक कोंडीत अडकतात. त्यामुळे आता न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -
ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात यांचे निधन
हा टोलनाका भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे ही टोलवसुली 1 जानेवारी 2014 पासून बंद व्हायला हवी होती. मार्च 2013 पर्यंत या रस्त्याचे 6 पदरी करण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, 2020 उजाडल्यानंतरही हे काम प्रलंबित आहे. त्यामुळे हा टोलनाका ताबडतोब बंद करण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.