पुणे - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेली पाचवी ते आठवीची शाळा आजपासून सुरू झाली. ग्रामीण भागातील पाचवी ते आठवीची शाळा 27 जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत. परंतु पुणे आणि मुंबई शहरातील कोरोनाची परिस्थिती पाहून या शहरातील शाळा एक फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार पुण्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.
दीर्घ कालावधीनंतर पुण्यातील पाचवी ते आठवीची शाळा सुरू अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर राज्यभरात 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग भरण्यासाठी राज्य शासनाने परवानगी दिली होती. त्यानंतर आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले. पाचव, सहावी आणि सातवी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय लक्षात घेता आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पुणे शहरातील एरंडवना परिसरात असलेली दीनदयाळ उपाध्याय शाळा आजपासून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू झाली आहे. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने शाळेत हजेरी लावली. सकाळी साडेसात वाजता सुमारास शाळा सुरू झाली. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मास्क आणि चॉकलेटचे वाटप करत त्यांचे स्वागत केले. तर शाळा प्रशासनानेही सुरक्षित अंतराचे पालन करत अध्यापनाला सुरुवात केली.
हेही वाचा - जाणुन घ्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?