पुणे - शहरातील विशाल सावंत या युवकाने सह्याद्रीच्या कुशीतील गड-किल्ल्यांचे ड्रोनच्या सहाय्याने चित्रीकरण केले. या किल्ल्यांचे महत्व आणि वैभवशाली इतिहास जनतेपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी हा यामागचा विशालचा उद्देश आहे. यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून विशाल काम करत आहेत.
राज्यातील किल्ले रायगड, राजगड, खादेली, लोहगड, जंजिरा, तिकोना आणि प्रतापगडसह आठ किल्ले तसेच सह्याद्री पर्वत रांगांतील कोकण किनारपट्टीचे हवाई चित्रण त्याने केले. त्यासोबत राष्ट्रगीताची धूनही त्याला जोडली. सध्या चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्याअगोदर राष्ट्रगीताची धून वाजवली जाते. मात्र यावेळी पडद्यावर फक्त तिरंगा फडकत असल्याचे दाखवले जाते. त्याऐवजी विशालने केलेल्या गड-किल्ल्यांच्या हवाई चित्रीकरणासोबत राष्ट्रगीताची धून ऐकवली गेली तर एक वेगळा अनुभव प्रेक्षकांना येईल, असे विशालला वाटते.
राष्ट्रगीताच्या धूनसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या या गडकिल्ल्यांचेही हवाई दर्शन प्रेक्षकांना घेता येईल. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताच्या वेळी या किल्ल्यांचे दर्शन घडवले जावे, यासाठी मुख्यमंत्र्यांना आणि सांस्कृतिक मंत्र्यांना विनंती करणार असल्याचेही विशालने सांगितले आहे.