पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन (Vikram Gokhale passed away) झालं आहे. गेल्या 5 नोव्हेंबरपासून त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर आज दुपारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत. जाणुन घेऊयात त्यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल...
मराठी सिनेसृष्टीत मोठी पोकळी: विक्रम गोखलेंच्या निधनाने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत (Marathi film industry) मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर नव्हती. त्यांना मल्टिपल ऑर्गन फेल्युर हा आजार झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तसे उपचार देखील सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर झाली होती, आणि आज दुपारच्या सुमारास त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने प्रेक्षकांना धक्का बसला आहे.
30 ऑक्टोबर 1945 रोजी पुण्यात जन्मलेल्या विक्रम गोखले यांनी भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक दर्जेदार भूमिका वठवल्या. अनेक वर्षे विक्रम गोखले हे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. विक्रम गोखले हे रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवरील अत्यंत नावाजलेले कलाकार होते. रंगभूमीवर त्यांनी एक मोठा काळ गाजवला. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमावलं.
आपल्या कठोर आवाजाने आणि स्पष्ट वक्ते तसेच अनुभवाने प्रतिष्ठित म्हणून विक्रम गोखले यांचे नाव सिनेविश्वात तसेच सामाजिक क्षेत्रात आदराने घेतले जात होते. आपल्या हरहुन्नरी अभिनयाने त्यांची कलाविश्वात वेगळी छाप होती. मागील काही दिवसांपूर्वी स्वतःची जमीन ही कलाकारांच्या भवितव्यासाठी आणि त्यांना विविध सवलती मिळाव्यात म्हणून 10 एकर जमीन दान देखील केली होती. तसेच नव्याने सिनेसृष्टीत येणाऱ्या कलाकारांना नाटक, व्हॉईस ओवर तसेच कलेचं ज्ञान व्हावं म्हणून प्रशिक्षण देखील देत होते.
प्रभावी अभिनय: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हम दिल दे चुके सनम' (1999) मध्ये ऐश्वर्या राय बच्चनच्या वडिलांच्या भूमिकेत प्रभावी कामगिरी केली. तसेच 'हे राम', 'तुम बिन', 'भूल भुलैया', 'हिचकी' आणि 'मिशन मंगल' यांसारख्या बॉलीवूड हिट चित्रपटांमध्ये देखील काम केले होते. त्यांचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट 'निकम्मा' ( 2022 ) होता. विशेष म्हणजे त्यांनी ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या बरोबर नटसम्राटमध्ये केलेली भूमिका ही प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे.