बारामती (पुणे) - सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, बलात्कारासह अन्य गंभीर स्वरुपाचे २६ गुन्हे दाखल असलेल्या टोळीविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. बारामती उपविभागात आतापर्यंत १९ गुन्हेगारी टोळ्यांंतील १२५ आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - पुण्यात ट्रॅक्टरसह 77 लाखाचा मुद्देमाल जप्त; ग्रामीण पोलिसांची कारवाई
अजय उर्फ अज्या शदर उर्फ शेऱ्या भोसले (वय २४ रा. नेर ता. खटाव जि. सातारा) विकास किरण शिंदे (वय २५ रा. नांदल ता. फलटण जि. सातारा) रावश्या कोब्या काळे (वय २५ रा. लासुरणे, हल्ली रा. काटी ता. इंदापूर जि. पुणे) दादा हनुमंत चव्हाण (रा. गाववडी, विसापूर ता. खटाव जि. सातारा) कॅसेट उर्फ काशिनाथ उर्फ भीमराव भोसले (वय ३५ रा. आंदरुड, ता. फलटण जि. सातारा) लखन पोपट भोसले (रा. वडगाव, जयराम स्वामी ता. खटाव जि. सातारा ) अशी मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची नावे असून लखन भोसले वगळता सर्व आरोपी अटकेत आहेत.
गोपनीय व तांत्रिक पुराव्याच्या आधारे केली अटक
बारामती तालुक्यातील सोनकसवाडी येथे वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री दोन घरांवर दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल होता. या घटनेत दरोडेखोरांनी एका बंद घराची घरफोडी करून आणखी एका घरात चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम, असा २ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय माहिती व तांत्रिक पुराव्याच्या आधारावरून आरोपींना अटक करून १ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल
अटक आरोपींविरोधात सातारा जिल्ह्यातील पुसेगाव, वडूज, औंध, कोरेगाव, दहिवडी, लोणंद, सातारा शहर, फलटण ग्रामीण, तसेच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, करमाळा, करकंब, तर पुणे जिल्ह्यातील बारामती शहर, इंदापूर, वडगाव निंबाळकर या पोलीस ठाण्यात चोरी, दरोड्याची तयारी, घरफोडी, बलात्कारासह जबरी चोरी, दरोडा आदी गंभीर स्वरुपाचे २६ गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होण्याकामीचा प्रस्ताव मंजूर झाल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, पो.स.ई. श्रीगणेश कवितके, योगेश शेलार, सहाय्यक फौजदार पोपट जाधव, पोलीस नाईक सूर्यकांत कुलकर्णी, गोरख पवार, बाळासाहेब पानसरे, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब मार्कड, अमोल भुजबळ, पोपट नाळे, अक्षय सिताप, सलमान खान, ज्ञानेश्वर सानप यांनी केली.
हेही वाचा - वयोवृद्ध महिलेवर अतिप्रसंग करून हत्या करणाऱ्याला अवघ्या ४ ते ५ तासात अटक