पुणे (बारामती) - टाळेबंदी दरम्यान संचारबंदीचे उल्लंघन करुन मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या बारामती शहरातील २५० हून अधिक स्त्री पुरुषांवर आज बारामती शहर पोलिसांनी कारवाई केली. शहरात ठिकठिकाणी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या बारामतीकरांना पोलिसांनी पकडून त्यांना येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर चालवत नेले. याठिकाणी पकडलेल्या सर्वांच्या नावांची नोंद करुन घेतली. त्यांना योगासनाचे धडे दिले. यावेळी सदर नागरिकांसोबत पोलिसांनी योगासनात सहभाग घेतला.
कोरोना संसर्ग रोखण्याच्या दुष्टीने लाॉकडाऊनसह संचार बंदी लागू आहे. या काळात कोणीही घरा बाहेर पडू नये, असा नियम असतानाही, लाॉकडाऊनचे उल्लंघन करत मॉर्निंग वॉकसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडत होते. या संदर्भात कारवाई करण्याच्या दुष्टीने पोलिसांनी रात्रीच नियोजन केले होते. त्यानुसार पोलिसांनी आज पहाटे ५.३० वा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पॉईंट लावून २५० हून अधिक नागरिकांना पकडले. यात शहरातील अनेक प्रतिष्ठीत नागरिकांचा ही समावेश आहे.
बारामती उपविभागात बारामती, इंदापूर येथील बेजबाबदार पणे विनाकारण दुचाकी घेवून रस्त्यावर फिरणाऱ्या ४७९ नागरिकांवर कारवाई करत त्यांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये बारामतीत २७५ तर इंदापूरात २०४ अशा एकूण ४७९ दुचाकी जप्त करुन संबंधितांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात आली आहे.