पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये धुळवडीला रंग खेळत असताना एका अल्पवयीन मुलाच्या अंगावर अॅसिड फेकल्याची गंभीर घटना समोर आली आहे. यामध्ये हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी घडली असून याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी मुलगा आणि गंभीर जखमी असलेला मुलगा हे दोघे ही एकमेकांच्या घरासमोर राहतात. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास दोघे धुळवडीच्या निमित्त रंग खेळत होते. एकमेकांच्या अंगावर रंग उडवत होते. हे सर्व सुरू असताना 8 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या अंगावर आरोपी अल्पवयीन मुलाने पांढऱ्या रंगाच्या बाटलीतील अॅसिड फेकले. यात अल्पवयीन मुलगा गंभीर भाजला आहे.
तत्काळ मुलाने त्याच्या आई-वडिलांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अल्पयीन आरोपी विरोधात सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची चौकशी देखील केली जात असून मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.