पुणे - काही महिन्यापूर्वी महिलेने दिलेली विनायभंगाची तक्रार, त्यानंतर पोलिसांनी केलेली अटक, या कारणावरूनच संपूर्ण पुणे शहराला हादरवून टाकणारी सदाशिव पेठेतील अॅसिड हल्ला आणि गोळीबाराची घटना झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण कुटुंबच आरोपीच्या निशाण्यावर असल्याचा खुलासाही पोलिसांनी केला.
रोहित थोरात याची आई आणि आरोपीची फेसबुकवर ओळख झाली होती. काही महिन्यापूर्वी आरोपीने अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी रोहितच्या आईने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून सिद्धराम कलशेट्टी याला अटक केली होती. याचा राग त्याच्या मनात होता, त्यातूनच हा प्रकार घडला.
आरोपीजवळ सापडलेल्या बॅगेत २ मोठे कोयते आणि २ चाकू आढळले आहेत. आपला उद्देश सफल न झाल्याने आरोपी सिद्धराम विजयकुमार कलशेट्टी (वय २५) याने स्वतःच्या भुवयांच्या मधोमध गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. तर हल्ल्यामध्ये रोहित थोरात (२५) हा युवक जखमी झाला आहे.
झोन १ चे पोलीस उपायुक्त बचन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री रोहित हा राहत असलेल्या घराजवळ मैत्रिणींसोबत बोलत उभा होता. त्यावेळी त्या ठिकाणी येऊन आरोपीने रोहितच्या अंगावर अॅसिड टाकले आणि पाठीवर गोळी झाडली. त्यानंतर पोलिसांना तातडीने घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रोहित रुग्णालयात नेले आणि आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी खूप वेळ पोलिसांना सापडत नव्हता. दरम्यान आरोपी इमारतीत लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संपूर्ण इमारतीत आरोपीचा शोध सुरू केला.
पोलीस आपल्याजवळ येत असल्याचे लक्षात येताच आरोपीने त्यांच्या दिशेने २ गोळ्या झाडल्या. आरोपीने गोळ्या झाडल्यानंतर पोलिसही सावध झाले. परंतु पोलिसांनी त्याला पकडण्याआधी त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली.त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाची मदत घेत तासाभरानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढला.