पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या विकृताला वाकड पोलिसांनी अटक केली. हर्षल विकास भेगडे (वय-28) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून त्याने महिलांसोबत असा विकृतपणा केला असल्याचा पोलिसांना संशय आहे.
इज्जतीला घाबरून अनेक प्रतिष्ठित महिला तक्रार देण्यास पुढे येत नव्हत्या. परंतु, 31 वर्षीय तक्रारदार महिलेसोबत विकृतपणा घडल्याने त्यांनी थेट वाकड पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून, तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे 31 वर्षीय महिला पतीसोबत सकाळी साडेसातच्या सुमारास कस्पटे कॉर्नर पुणे येथुन वॉकिंग करत होती. त्याचवेळी पाठीमागून टीव्हीएस एनटॉर्क दुचाकीवरील व्यक्तीने त्या महिलेचा विनयभंग केला. दरम्यान, आरोपी हर्षल हा दुचाकीवर असल्याने धूम ठोकली. काही दिवस विचार केल्यानंतर संबंधित महिलेने वाकड पोलिसात तक्रार दिली असून, आरोपी हर्षल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षल हा दुचाकीचा नंबर दिसू नये म्हणून सेलो टेपचा वापर करत असे. सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक तापसाद्वारे आरोपीला सहायक पोलीस निरीक्षक हरिश माने, सिद्धनाथ बाबर यांच्या पथकाने अटक केली आहे. हर्षल हा अॅमेझॉनमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. ज्या महिलांसोबत असा विकृतपणा घडलेला आहे त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी केले आहे.