पुणे - कोरोना आजारावरील 60 वर्षावरील आणि 45 वर्षावरील कोम ऑरबीड लसीकरणाला पुणे शहरात सुरुवात झाली आहे. शहरातील चार शासकीय रुग्णालयात सध्या लसीकरण सुरू असून लवकरच शहरातील 40 खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. यासाठी महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली खासगी रुग्णालयांची यांची बैठक घेण्यात आली असून त्यादृष्टीने नियोजन केले जात आहे. सध्या पुण्यातील बीजे मेडिकल कमला नेहरू राजीव गांधी रुग्णालय आणि सुतार रुग्णालयामध्ये लसीकरण सुरू आहे. पुण्यातील दोन खासगी रुग्णालयांनी लसीसाठीचे पैसे सरकारला जमा केले आहेत. मात्र, काही तांत्रिक बाबींमुळे अद्याप त्या ठिकाणी लसीकरण सुरू झालेले नाही. आज (2 मार्च) झालेल्या 40 रुग्णालयांच्या बैठकीत यासंदर्भातील नियोजन करण्यात आले सरकारकडे या खासगी रुग्णालयांना आधी पैसे जमा करावे लागतील त्यानंतर त्यांना महापालिकेकडून लसीचे डोस पुरवले जाणार आहेत.
त्यामुळे पुण्यातील कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्यासाठी आता या 40 खासगी रुग्णालयांतून लसीकरण केंद्र उभारली जाणार आहे. या खासगी रुग्णालयांना प्रति डोस दीडशे रुपये प्रमाणे पालिकेमार्फत लस पुरवठा केला जाणार आहे. शंभर रुपये व्यवस्थापन चार्जेस लावून हे खासगी रुग्णालय ही लस अडीच रुपयांना सर्वसामान्यांना उपलब्ध करून देतील अशी माहिती पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. दरम्यान, गेले दोन दिवस पुणे शहरातील चार सरकारी केंद्रांवर सर्वसामान्यांसाठी लसीकरण सुरू झाले असले तरी मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करत असल्याने गोंधळ निर्माण होतानाचे चित्र पाहायला मिळाले आहे. यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना केल्या जात असल्याचे डॉ. भारती यांनी सांगितले.
दरम्यान, आज सर्व्हर डाऊन झाल्याने लसीकरण थांबवावे लागल्याचे दिसून आले. आता लवकरच खासगी रुग्णालयात देखील उपलब्ध होणार असल्याने नागरिकांची सोय होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, यामध्ये किती खासगी रूग्णालय पुढे येतात हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे.
हेही वाचा - पुणे विभागातील 5 लाख 90 हजार 625 कोरोनाबाधित रुग्ण बरे; पाहा सविस्तर आकडेवारी