राजगुरुनगर (पुणे) - पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यातील चौदाशे गावांचे गावकारभारी कोण होणार यासाठी तालुक्यानुसार सरपंच आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांनी पार पाडली. यावेळी गावागावातील गाव पुढारी, राजकीय नेते हे यावेळी उपस्थित होते मात्र या सोडती दरम्यान खेड तालुक्यातील महिलांनी मात्र गाव कारभाराच्या आरक्षण सोडत कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
महिलांना ५० टक्के आरक्षण मात्र सोडतीला केवळ एकच महिला उपस्थित
खेड तालुक्यातील १६२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी होणाऱ्या आरक्षणाची सोडत राजगुरुनगर जवळील खांडगे लॉन्स येथे पार पडली. ग्रामपंचायत सरपंच आरक्षणामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र यावेळी संपूर्ण सोडतीच्या कार्यक्रमादरम्यान एक महिला उपस्थित होती. उर्वरित सर्व महिलांनी सरपंच आरक्षणाच्या सोडतीकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी गाव कारभारी बनण्यासाठी प्रयत्न केले आणि यातून अनेक महिलांना विजयाचे शिखरही गाठता आले. मात्र गावाचा कारभारी बनण्याची वेळ आली असताना महिलांनी मात्र घरातच राहणे पसंत केल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहायला मिळाले आहे.
घराला घरपण देणारी महिला....
गावाला गावपण देण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उभी राहिली आणि अनेक महिलांनी या गावकी भावकीच्या निवडणुकीत विजयाच्या शिखरावर झेंडा लावला. मात्र ज्यावेळी गावच्या गावकारभारी होण्याची सूत्रे हातात घ्यायची, त्या सरपंच आरक्षण सोडत सुरू असताना महिलांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.