पुणे - भाजपला विरोध करण्यासाठी आप पक्षाने महाराष्ट्रात भाजप विरोधात सक्षमपणे लढत असलेल्या दुसऱ्या इतर उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आली.
मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास देशात अराजक माजेल. मोदी हे हुकूमशाही पद्धतीने सत्ता राबवत असून या निरंकुश होत चाललेल्या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी आप पक्षाने पक्षीय भूमिका बाजूला ठेवत राष्ट्राचा विचार केला असल्याचे आप पक्षाचे महाराष्ट्रातील समन्वयक ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले. भाजपला हरवण्यासाठी इतर सक्षम उमेदवाराला आपला पाठिंबा देणार असल्याचे ते म्हणाले.
पक्षाची ही भूमिका देशपातळीवर असून महाराष्ट्रातदेखील ज्या ज्या ठिकाणी भाजपला सक्षम विरोधक आहेत, त्या त्या ठिकाणी अशा उमेदवारांना आपचा पाठिंबा असल्याचे सावंत यांनी सांगितले. मोदी सरकारच्या काळात ज्या बेबंदशाहीने निर्णय घेतले गेले त्यामुळे देशाचे हित धोक्यात आले आहे. आताचा हा निर्णय लोकसभेपुरता मर्यादित असून विधानसभेत मात्र, आप पक्ष पूर्ण ताकदीनिशी राज्यात सर्व जागा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आप ने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेसला विरोध केला होता. तो आजही कायम असला तरी सध्या देशासमोर मोदी-शहा या जोडगोळीचे मोठे संकट आहे. अशा परिस्थितीत भाजप हा आप पक्षाचा पहिला शत्रू आणि काँग्रेस दुसरा शत्रू आहे. त्यामुळे सध्यातरी भाजपला सत्तेतून दूर करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आप पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. पुणे शहरातही आम आदमी पक्षाच्या वतीने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.