पुणे - दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी करोडो गणेशभक्त मोठ्या जल्लोषात आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करत असतात. त्यावेळी त्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे एक विदेशी महिला गणेशभक्त आहे. ती मागील २८ वर्षांपासून मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करते. मरियाना असे त्या महिलेचे नाव असून ती ख्रिश्चन धर्मिय आहे.
मूळच्या रशियाच्या मरियाना या १९९३ साली निर्मला देवीच्या 'सहज योगा' या कार्यक्रमासाठी भारतात आल्या होत्या. त्या कार्यक्रमात त्यांची ओळख जेजुरी येथील डॉ. विवेक आबनावे यांच्याशी झाली. नंतर या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्या दोघांनी लग्न केले. लग्नानंतर मरियाना जेजुरी येथे स्थायिक झाल्या. त्यानंतर त्यांनी ख्रिश्चन धर्मियांच्या सणांसह हिंदू धर्मियांचे सर्व सण साजरा करण्यास सुरूवात केली. यात त्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात.
विशेष बाब म्हणजे, मागील २८ वर्षात मरियाना यांनी गणेश मूर्ती विकत घेतली नाही. त्या घरीच शेतातील माती आणून गणेश मूर्ती तयार करतात. या कामी त्यांना आबनावे कुटुंबीयातील सदस्यांची मदत होते. मरियाना या अथर्वशीर्ष पठण व धार्मिक पूजा करतात. त्यांची ही परंपरा मागील २८ वर्षांपासून अखंडित सुरू आहे. मी दरवर्षी मातीचा गणपती बनवते. महत्वाचे म्हणजे मला गणपती तयार करण्यासाठी कोणी शिकवलं नाही. हे सर्व करताना मला एक वेगळा आनंद मिळतो, अशी भावना 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मरियाना यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - अष्टविनायक दर्शन : पृथ्वीतलावरील पहिले गणेशाचे मंदिर, जाणून घ्या मोरेश्वराची अख्यायिका
हेही वाचा - राहुल गांधींशिवाय कोणाचेच नेतृत्व स्वीकारणार नाही- माजी आमदार मोहन जोशी