बारामती (पुणे)- डोक्याचे केस आणि दाढी वाढवत साधूची वेशभूषा करून देशाच्या समस्या सुटणार नाहीत. वाढवायचे असेल तर लसीकरण वाढवा, आरोग्याच्या सोयी वाढवा, मागील पंधरा महिन्यांपासून टाळेबंदीच्या नावाखाली रोजगार बुडाल्यांना रोजगार द्या. अशा आशयाचे पत्र लिहून बारामतीतील एका चहावाल्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाढी व कटिंग करण्यासाठी १०० रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे.
'या'कडे लक्ष वेधण्यासाठी कष्टाचे शंभर रुपये -
अनिल संभाजी मोरे असे या चहा विक्रेत्याचे नाव आहे. बारामती येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या स्मारकसमोर रस्त्याच्या कडेला मोरे अनेक वर्षांपासून एका छोट्याशा स्टॉलवरून चहाची विक्री करतात. या व्यवसायावर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र वारंवार होत असलेल्या टाळेबंदीमुळे अनेक दिवस चहाचा स्टॉल बंद असल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. देशातील अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. टाळेबंदीमुळे नागरिकांना मूलभूत गरजा भागवणे ही मुश्कील झाले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मी माझ्या व्यवसायातून कमावलेल्या कष्टाचे शंभर रुपये पंतप्रधान मोदी यांना दाढी व कटिंग करण्यासाठी मनीऑर्डर केले असल्याचे मोरे सांगतात.
तुम्ही चहावाले होता मी ही चहावाला -
मोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागील दीड वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. केंद्र व राज्य सरकारकडे योग्य व ठोस नियोजन नसल्याने नाहक लोकांना टाळेबंदीच्या नावाखाली भिकारी बनवून रोजगाराच्या उत्पन्नाची साधने नाहीशी केली आहेत. भारतीयांना अक्षरशा देशोधडीला लावले आहे. आपण देशाचे जबाबदार प्रथम नागरिक आहात. आपल्यावर सर्वांची जबाबदारी आहे. राजकारण बनवेगिरी सोडून तुम्ही पहिले दाढी-कटिंग करा. तुमचे टापटीप राहणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला जन उपयोगी असंख्य महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. मार्ग काढायचा आहे. भारतीयांचे मुळ प्रश्न अडचणी समस्यांकडे आपले पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सदर बाब अत्यंत गंभीर आहे. तुम्ही चहावाले होता मी ही चहावाला आहे. म्हणून माझ्या कष्टाची कमाई शंभर रुपये आपणास पाठवीत आहे. तुम्ही दाढी कटिंग करून घ्या. या आशयाचे पत्र मोरे यांनी पाठवले आहे.
हेही वाचा - बारामतीत लहान मुलांच्या लसीकरणाच्या चाचण्या होणार