पुणे- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सांगवी पोलिसांनी विना परवाना पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून २ गावठी पिस्तुल आणि ६ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. मंगेश सुरेश जाधव (वय २१ रा. निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री अकराच्या सुमारास सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल विलाकासा येथे अज्ञात व्यक्ती गावठी पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी चंद्रकांत भिसे, देवकांत, दीपक पिसे, विनायक देवकर यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गुळीग यांच्या पथकाने हॉटेल विलाकासा नाशिक फाट्या जवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे २ पिस्तुल आणि ६ जिवंत काडतुसे मिळून आली.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गुळीग, पोलीस उपनिरीक्षक यशवंतराव साळुंके, चंद्रकांत भिसे, रोहिदास बोऱ्हाडे, कैलास केंगले, सुरेश भोजने, शशिकांत देवकांत, दीपक पिसे, आदींनी केली आहे.
हेही वाचा- प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यात महिला सफाई कर्मचाऱ्यांचे 'थाळी बजाव आंदोलन'