पुणे- एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी निघालेली गाडी अडवून ४३ लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील आठ फाटा येथे घडला. या संदर्भात पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुधीर भिसे व इतर दोघे रा. सदोबाचिवाडी ता. बारामती हे चारचाकी वाहनातून सोमेश्वर येथील बडोदा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरून सोमेश्वर ते बारामतीकडे जात होते. या दरम्यान या पैसे घेऊन जाणाऱ्या गाडीसमोर आठ फाटा होळ येथे दुचाकी आडवी लावत चाकूचा धाक दाखवून पाच जणांनी 43 लाख रुपये असलेली बॅग लुटून नेली. या घटनेची माहिती मिळताच नाकाबंदी करून पाठलाग करत अवघ्या काही तासांतच पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. निलेश बाप्पू जाधव, राज विनोद मलिक, कुमार लक्ष्मण शिंदे, निशांत विजय पवार, गणेश ज्ञानदेव शेंडगे सर्व रा. रविवार पेठ, फलटण ता. फलटण जि. सातारा, यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून चोरी केलेली 43 लाख रुपयांची रक्कम व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
बंदोबस्तादरम्यान खंडू खैरेवाडीच्या पोलीस पाटील रुपाली जगताप व त्यांचे पती विजय जगताप यांनी भोंडवेवाडीकडे संशयास्पद गेलेल्या दुचाकीस्वारांची माहिती पोलिसांना दिली. नाकाबंदी वर कार्यरत असणारे विशाल नगरे यांनी तात्काळ पाठलाग करत दोन आरोपींना चोरलेल्या रकमेसह ताब्यात घेतले. तर जेजुरी मोरगाव रस्त्यावरील शेतातून पळून जात असलेल्या दोन आरोपींना पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. तसेच बारामती तालुक्यातील ढाकाळे पंदारे या मार्गावरून दुचाकीवरून पळून जात असलेल्या एका आरोपीला पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले.
ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सोमनाथ लांडे, श्री गणेश कवितके, साळुंखे, सहा. फौज. पोपट जाधव, पोलीस हवालदार रवींद्र पाटमास, भाऊसो शेडगे, संजय मोहिते, रवींद्र गायकवाड, बाळासो पानसरे, विठ्ठल कदम, विशाल नगरे, सलमान खान, प्रदीप काळे, हिरालाल खोमणे, ज्ञानेश्वर सानप, अमोल भुजबळ, भाऊसाहेब मारकड, वडगाव पोलीस स्टेशन यांनी केली. कौतुकास्पद कामगिरी करून यश मिळवलेल्या टीमला वरिष्ठांकडून बक्षीस जाहीर करण्यात आले. पोलीस महासंचालकांनी पोलीस पाटील रुपाली जगताप यांना 10 हजार रुपये तर विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांनी संपूर्ण टीमला 50 हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे.