पुणे - दिव्यांगांना आयुष्य जगताना अनेक समस्यांशी झगडावे लागते. त्यांना विविध कामांसाठी इतरांची मदत घ्यावी लागते. पण, सकारात्मक दृष्टीकोन, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपणास आपल्या सर्व अडचणींवर मात करता येते, याची प्रचिती पुण्यात आली आहे. जन्मापासूनच दिव्यांग असलेल्या निखिल बाजी याने अनेक अडचणींना तोंड देत न्यायाधीश परीक्षेत यश मिळवले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याची न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे.
पुण्याच्या नवी पेठेत निखिल बाजी हा कुटुंबीयांसह राहतो. बारावीपर्यंतचे शिक्षण पुण्यात झाल्यानंतर त्याने 'गुजरात नॅशनल लॉ स्कूल' मधून कायद्याची पदवी घेतली. पुणे न्यायालयात त्याने काही वर्षे सरावही केला. वकिली सुरू असतानाच त्याने न्यायाधीशाची परीक्षा देण्याचे ठरवले. रोजचे कामकाज सांभाळून त्याने दररोज तीन तास अभ्यास केला आणि या परीक्षेत यश मिळवले.
आपल्या यशाविषयी सांगताना निखिल म्हणाला, मी इतरांपेक्षा वेगळा आहे असा विचार कधीच केला नाही. माझ्या कुटुंबीयांनी, मित्रांनी, शाळेतील शिक्षकांनी कधीच मला हे जाणवू दिले नाही. उदा. लहान असताना माझे मित्र क्रिकेट खेळायचे. तेव्हा मलाही क्रिकेट खेळण्याची इच्छा व्हायची. अशावेळी मी आपण क्रिकेट खेळू शकत नाही पण अंपायर तर होऊ शकतो, असा सकारात्मक विचार करायचो आणि अंपायर होऊन खेळाचा आनंद घ्यायचो. नकारात्मक गोष्टींना सकारात्मक करणे आपल्याच हातात असते. अशाप्रकारे मी आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीतील सकारात्मक बाजू पाहत गेलो. लोकांचीही दिव्यांग व्यक्तीकडे पाहण्याची दृष्टी आता बदलली आहे. लोक स्वतःहून अशा व्यक्तीच्या मदतीसाठी येतात हा एक चांगला बदल आहे.
हेही वाचा - ...अखेर पुणे मेट्रोची बोगी रुळावर सवार!
निखिल म्हणतो, न्यायाधीशपदाची परीक्षा ही कस पाहणारी असते. या परीक्षेला सामोरे जाताना प्राथमिक, मुख्य आणि तोंडी असे तीन टप्पे पार करावे लागतात. एखाद्या घटनेकडे तुम्ही व्यक्ती म्हणून कसे पाहता हे यातून पाहिले जाते. सखोल वाचन आणि चालू घडामोडींविषयी असलेली माहिती याचा मला परीक्षेवेळी खूप फायदा झाला. माझ्या यशात गणेश सरांचेही योगदान असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.
हेही वाचा - पुण्यात एनआरसी आणि सीएए विरोधात मुस्लीम समाजाचा आणखी एक मोर्चा