पुणे - वाट चुकून पुण्यातील नांदेड सिटी परिसरात आलेले एक हरीण भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले होते. घाबरलेल्या या हरणावर स्थानिक नागरिक महेश मोहोळ यांनी प्रथमोपचार केले. यानंतर त्याला वनविभागाच्या ताब्यात दिले. आज सकाळी ही घटना घडली.
महेश मोहोळ हे सकाळी व्यायामाला जात असताना त्यांना नांदेड सिटी परिसरातील रस्त्यावर कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता जखमी अवस्थेत एक हरीण तिथे पडले होते. त्याच्या पायात प्लास्टिकचे वेटोळे अडकल्यामुळे त्याला पळताही येत नव्हते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला होता. महेश मोहोळ यांनी तत्काळ हरणाची पाहणी केली आणि त्याच्यावर प्रथोमचार केले.
प्रथोमपचारानंतर महेश मोहोळ यांनी वनविभागाशी संपर्क केला आणि हरणाला वनविभागाकडे सोपवले. हरणावर उपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडले जाणार असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. केरळमधील हत्तीणीच्या मृत्यूची घटना ताजी असतानाचा महेश मोहोळ यांची ही मदत सर्वांसाठीच एक आदर्श आहे.