पुणे - अवघ्या 9 वर्षांच्या चिमुरडीने सह्याद्री पर्वत रांगातील लिंगाणा या अवघड कड्यावर रॅपलिंग करण्याचे धाडस केले आहे. स्वानंदी सचिन तुपे, असे या चिमुकलीचे नाव आहे. कमी वयात केलेल्या कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा - मंत्रालयात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; कामासाठी वारंवार खेटे मारण्यामुळे होती अस्वस्थ
लोणी काळभोर गावातील कुंजीर वाडी येथे राहणारी स्वानंदी एम. आय. टी. शाळेत इयत्ता चौथीमधे शिकते. शिक्षणासोबत गड किल्ल्यांची आवड असलेल्या स्वानंदीची वडील सचिन तुपे आणि काका पंडित झेंडे यांच्यासोबत नेहमी भटकंती सुरू असते. आत्तापर्यंत तिने सह्याद्री रांगेतील अनेक गड-किल्ले सर केले आहेत. यावेळी अत्यंत अवघड समजला जाणारा लिंगाणा गड तिने सर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लिंगाणा कड्यावर रॅपलिंग करण्याचे त्यांनी ठरवले.
वडील सचिन तुपेसोबत 9 डिसेंबरला खीरेश्वर येथून सायंकाळी ६ वाजता तिने हरिश्चंद्रगड चढण्यास सुरुवात केली. रात्री साडेनऊ वाजता ती गडावर पोहोचली. तेथे रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी १० डिसेंबरला पहाटे कोकण कड्यावर पोहोचली. दरम्यान, सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास तिने कोकण कड्यावरून रॅपलिंग करायला सुरुवात केली.
सुरुवातीला पहिला 900 फुटांचा टप्पा पार करायला अर्धा तास लागला. हा टप्पा पूर्ण करणे म्हणजे दोरीच्या सहाय्याने खाली जाणे. त्यानंतर दुसरा टप्पा हा ६०० फुटांचा आहे. तो तिने १० मिनिटात पार केला, तर तिसरा ३०० फुटांचा टप्पा तिने ८ मिनिटात पार केला. प्रथमच ९ वर्षाच्या मुलीने १ हजार ८०० फुटांचे रॅपलिंग केले असल्याने स्वानंदीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.