पुणे- पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने सर्वाधिक 89 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 3 बाधित हे पिंपरी-चिंचवड महानगर पालिका हद्दी बाहेरील आहेत. तर खराळवाडी येथील 60 वर्षीय महिलेचा आणि कासारवाडी येथील 62 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.
शहरातील बाधितांची एकूण संख्या एक हजार 17 वर पोहोचली आहे. दरम्यान आज 10 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला असून आत्तापर्यंत शहरातील 516 तर महानगर पालिकेच्या हद्दी बाहेरील 75 जण करोनामुक्त झालेले आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत 37 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज आढळलेले कोरोनाबाधित रुग्ण हे भाटनगर, पिंपरी, दापोडी, वाकड, आनंदनगर चिंचवड स्टेशन, साई बाबा नगर चिंचवड, खराळवाडी, काळभोरनगर, नेहरुनगर, काळेवाडी, नानेकर चाळ, पिंपरी रेल्वेस्टेशन, बौध्दनगर पिंपरी, चिंचवडगाव, भोसरी, अंजठानगर, वाल्हेकरवाडी, दिघी, बोपखेल, मोरवाडी, औंध, चाकण व केंदूर पाबळ येथील रहिवाशी आहेत.
तर, आनंदनगर चिंचवडस्टेशन, सदगुरुनगर वाकड, जुनी सांगवी येथील रहिवाशी असलेले कोविड-19 बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.