पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभागाकडून घेण्यात येत असलेल्या खबरदारीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कमी झाले आहे. पुण्यात 3 शाळांचे सीबीएससी प्रमाणपत्र बोगस आढळून आल्यानंतर नुकतीच शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील शाळांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यात तब्बल 800 अशा शाळा आहेत ज्यांनी शासनाचे बेसिक प्रमाणपत्रही बनवले नाही, मात्र ते गेल्या कित्येक वर्षापासून शाळा चालवत आहेत. आता विविध जिल्ह्यातील अशा 77 शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
77 शाळा कायमस्वरुपी बंद केल्या : शिक्षण विभागाच्या तपासणीत राज्यात अशा बोगस शाळांचं अधिक प्रमाण मुंबई आणि पालघर जिल्ह्यात असल्याचं उघड झालं आहे. यातील 77 शाळा ह्या कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत. तर ज्या शाळांचे प्रमाणपत्र बोगस आहे अशा शाळांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने जी तपासणी केली आहे त्यात संलग्न नसलेल्या 329, मान्यता नसलेल्या 390, इरादा पत्र नसलेल्या 366, बंद केलेल्या 100 आणि दंड केलेल्या 89 शाळांचा समावेश आहे.
800 शाळांकडे अत्यावश्यक कागदपत्रे नाहीत : पुण्यात जेव्हा 3 शाळांच्या बनावट कागदपत्रांचं प्रकरण उघडकीस आला तेव्हा राज्यातील सर्वच शाळांची तपासणी सुरू करण्यात आली होती. राज्यातील शाळांकडे शासनाची अत्यावश्यक कागदपत्रे म्हणजेच शासनाचं इरादा पत्र, शासनाचं नाहरकत प्रमाणपत्र आणि सलग्न प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पण राज्यातील सुमारे 800 शाळांकडे यातील किमान एक प्रमाणपत्र नाही आहे. यापैकी 77 शाळांकडे तर शासनाचे मुलभूत इरादापत्रच नसल्याचे दिसून आले आहे. या 77 शाळा बंद करण्यात आले असून 300 शाळांना नोटीस पाठविण्यात आली आहे. तर 98 शाळांना दंड देण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
बोगस शाळांवर कारवाई होणार : यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'ज्या शाळांना नोटीस देण्यात आली आहे त्यांच्याविरुद्ध आता कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अनमिततेच्या कारवाईशी मिळती जुळती असणार आहे. जर बनावट कागदपत्रांचा वापर केला असेल तर एफआयआर होईल. आत्तापर्यंत 7 प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच कागदपत्रांची देखील शहानिशा केली जाणार आहे. तो पर्यंत या शाळा बंद करण्यात येणार आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्या मुलांना नजीकच्या दुसऱ्या शाळेत पाठविण्यात येणार आहे'.
या शाळांचा समावेश : शिक्षण विभागाच्या वतीने तपासणी नंतर ज्या 77 बोगस शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे त्यात पुणे - 5, मुंबई - 13, पालघर - 20, ठाणे - 15, रायगड - 1, औरंगाबाद - 1, जालना - 2, बीड - 1, उस्मानाबाद - 1, नांदेड - 1, नागपूर - 10, वर्धा - 1, अकोला - 1, यवतमाळ - 1, नाशिक - 1, जळगाव - 1, रत्नागिरी - 1, सिंधुदुर्ग - 1 या शाळांचा समावेश आहे. पुण्यातील विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, ताम्हणे वस्ती ट्विन्सलँड इंग्लिश प्राइमरी स्कूल, लिटिल हार्ट इंग्लिश स्कूल, लासुर्णे ज्ञानराज प्रायमरी स्कूल, कासरवाडी वडगाव शेरी येथील लेडी ताहेरुन्निसा इनामदार मराठी शाळा व इस्रा प्राथमिक विद्यालय बंद करण्यात आले आहे.