पुणे - राजगुरुनगर नगरपरिषदेत कर्मचाऱ्यांनी मालमत्ता कर आणि अन्य करांच्या जमा रकमेपैकी 71 लाख रुपयांवर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनीच डल्ला मारल्याचे लेखा परिक्षण अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणाला दीड महिना होऊनही कारवाई होत नसल्याने आज नगरपरिषदेवर काळे झेंडे दाखवत नगरसेवकांनी घोषणाबाजी करत आंदोलन केले.
राजगुरुनगर नगरपरिषदेच्या स्थानिक निधी लेखा परिक्षण विभागाकडून 2018-19 या आर्थिक वर्षातील राजगुरुनगर नगरपरिषदेच्या लेखा परिक्षणाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. या अहवालात मालमत्ता कर आणि अन्य करांच्या जमा रकमेपैकी 71 लाखांची रक्कम नगरपरिषदेकडे जमा न करता आधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमताने हडप केल्याचे समोर आले आहे. दोषी आधिकाऱ्यांवर दोन महिने उलटल्यानंतरही मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप कारवाई करत नसल्याने नगरसेवकांनी आज नगरपरिषदेसमोर काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केली.
राजगुरुनगर शहरातील नागरिकांनी आपला मालमत्ता कर व इतर कर नगरपरिषदेत भरला आहे. मात्र, या कराची रक्कम कर्मचाऱ्यांनी नगरपरिषदेत भरली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर या प्रकरणाला नगरसेवक संपदा सांडभोर, सचिन मधवे, शंकर राक्षे, राहुल आढारी यांनी वाचा फोडली. मात्र, अद्यापही कारवाई होत नसल्याने नगरसेवकांनी नगरपरिषदेसमोर निषेध व्यक्त केला आहे.