बारामती (पुणे) - बारामतीत मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तीन दिवसांत तीनशेहून अधिक रुग्ण सापडले आहेत. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने बारामती नगरपालिकेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी चौदा दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. मात्र, विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याचा आरोप करत बारामतीतील व्यापाऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी दर्शविली आहे. यामुळे 14 दिवसांच्या जनता कर्फ्यूची मुदत आता सात दिवसांवर आणण्यात आली आहे.
दरम्यान, काल (शुक्रवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी व्यापाऱ्यांनी संपर्क साधून जनता कर्फ्यूचा कालावधी कमी करण्याची विनंती केली. त्यानंतर प्रशासनासोबत व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत 14 दिवसांऐवजी सात दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या सात दिवसांच्या कालावधीत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली नाही. तर पुढील कालावधीसाठी जनता कर्फ्यू कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मागील लॉकडाऊन दरम्यान व्यापार्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. टाळेबंदीनंतर आता कुठे व्यापार सुरळीत होऊ लागला असतानाच पुन्हा 14 दिवस पूर्णतः बंद ठेवल्यास मोठा आर्थिक फटका व्यापाऱ्यांना बसणार आहे. ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांना व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आली. तद्नंतर झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - बारामती : कृष्णा जाधव खून प्रकरणातील फरार आरोपीला २ वर्षानंतर अटक