पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी 651 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबधितांची एकूण संख्या 16 हजार 283 वर पोहोचली आहे. दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून 753 जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सध्या 3 हजार 427 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - संतापजनक! कोरोनाबाधितांना नेण्यासाठी रुग्णवाहिका चालकाने मागितले नऊ हजार रुपये..
रविवारी 753 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण 10 हजार 911 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दहा दिवसांच्या लॉकडाऊननंतर लागू झालेल्या ‘अनलॉक’ च्या पहिल्या दिवशी 843, दुस-या दिवशी 1 हजार 79 आणि तिसऱ्या दिवशी 651 एवढे रुग्ण सापडले आहेत. आज मृत झालेले रुग्ण वाकड (स्त्री 65 वर्षे), वाल्हेकरवाडी (पुरुष 55 वर्षे), निगडी (पुरुष 52 वर्षे), चिंचवड (स्त्री 65 वर्षे, पुरुष 54 वर्षे, पुरुष 64 वर्षे), चिखली (पुरुष 86 वर्षे), मोरवाडी (स्त्री 71 वर्षे), पाषाण (पुरुष 30 वर्षे) येथील रहिवासी आहेत. आजवर शहरात 284 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात दिवसभरात ९ हजार ४३१ नव्या कोरोनाग्रस्तांची नोेंद...
राज्यात आज (रविवार) ६ हजार ४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या २ लाख १३ हजार २३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९ हजार ४३१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १८ लाख ८६ हजार २९६ नमुन्यांपैकी ३ लाख ७५ हजार ७९९ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८ हजार ४२० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६३ टक्के एवढा आहे.