बारामती (पुणे)- बारामती स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने बारामती ते महाबळेश्वर अशी सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. या सायकल रॅलीत एका ज्येष्ठ दाम्पत्यानेही सहभाग घेतला होता आणि त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर २५० किलोमीटर अंतराची सायकल रॅली पूर्ण करून दाखवली आहे. बारामतीतील ६५ वर्षाचे ललित पटेल आणि त्यांच्या पत्नी गीता पटेल, असे त्या ज्येष्ठ दाम्पत्याचे नाव आहे.
सायकलिंगद्वारे घटवले १०९ किलो वजन-
बारामतीत सायकल चळवळीला प्रोत्साहन मिळावे, व्यायामाची आवड समाजात वाढीस लागावी, युवक व महिलांमध्ये सायकल चालविण्याची सवय लागावी या उद्देशाने बारामती स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बारामती , फलटण आदर्की , वाई , पाचगणी मार्गे महाबळेश्वरचे २५० किलोमीटर अंतर पार करत ही मोहीम फते केली. सर्वांचा उत्साह दांडगा होता. त्याच प्रमाणे या रॅलीमध्ये सहभागी होत सोळा वर्षाच्या युवकांपासून ते ललित पटेल व गीता पटेल या ज्येष्ठांनी ही रॅली पार पाडली. तरुण मुलींनी तसेच महिलांनी देखील वेळ काढून दररोज व्यायाम करणे गरजेचे असल्याचे गीता पटेल यांनी सांगितले. तर अवघ्या काही महिन्यात गीता पटेल यांनी सायकलिंगद्वारे आपले १०९ किलो वजन हे थेट ५१ किलोवर घटवण्याची किमया साधली आहे.
अनेक मॅरेथॉन स्पर्धा गाजवल्या-
या अगोदर देखील अनेक सायकल स्पर्धेमध्ये, मॅरेथॉन मध्ये सायकल रॅलीमध्ये या दोघांनी सहभाग घेत अनेक मेडल, ट्रॉफी बक्षिसे मिळवली आहेत. यामध्ये कोल्हापूर स्पोर्ट क्लब ड्युट लॉन स्पर्धा , सातारा हिल मॅरेथॉन कासपठार स्पर्धा, लोकमत महा मॅरेथॉन स्पर्धा, बजाज लाइफ मॅरेथॉन, शरद मॅरेथॉन, अशा अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. कॉलेजमध्ये असताना तर तरुणपणी ललित पटेल यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धा गाजवल्या आहेत.अनेक सायकल रॅलीमध्ये सहभाग देखील घेतला होता. कोरोनावर मात करायचा असेल आणि प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर दररोज नित्य नियमाने व्यायाम, सायकलिंग, रनींग केले पाहिजे, असे ललित पटेल म्हणतात.