पुणे - पिंपरी-चिंचवड शहर हे कामगार नगरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शहरात परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे त्यांची गावाकडे जाण्याची धडपड सुरू झाली असून वाकड परिसरातून पोलिसांच्या मदतीने ६२ कामगारांना उत्तर प्रदेश येथे जाण्यासाठी बस उपलब्ध करून दिली आहे. यावेळी 'महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद'च्या घोषणा बसमधील नागरिकांनी दिल्या आणि आभार मानले.
गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे अनेकांचे हाल झाले असून प्रत्येक जण गावी जाण्याचा विचार करत आहे. सर्वांना तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता लक्षात घेता मिळेल त्या वाहनाने परप्रांतीय नागरिक जात आहेत. परंतु, पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्याच्या परिसरात राहणारे ६२ परप्रांतीय नागरिकांनी पोलिसांकडे उत्तर प्रदेश येथे जाण्यास परवानगी मागितली होती. त्यानुसार त्यांना मदत करत पोलिसांनी परवानगी दिली आहे. रात्री उशिरा सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत त्यांना दोन बसमध्ये बसवून दिले. यावेळी महाराष्ट्र पोलीस जिंदाबादच्या घोषणा देत परप्रांतीय नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले.