पुणे - वाढत्या कोरोना संसर्गामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. याचा परिणाम धान्य मार्केटवर ही झाला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे धान्य मार्केट हे पुण्यातील मार्केट यार्ड भागात आहे. हा भाग सील केलेला असल्याने मार्केट यार्डही बंद आहे. मात्र, शहरासाठी लागणाऱ्या अन्नधान्यात कमतरता भासू नये यासाठी जिल्ह्यातील इतर उपबाजार गुरुवारी सुरू आहेत.
ठिकठिकाणच्या उपबाजारात गुरुवारी एकूण 248 गाड्यांची आवक झाली. त्यातून 5450 क्विंटल माल उपलब्ध झाला आहे. यात मोशी उपबाजार खुले असून 103 गाड्यांची आज आवक झाली. ज्या माध्यमातून 3200 क्विंटल माल बाजारात उपलब्ध झाला आहे. तसेच मांजरी उपबाजारात 115 गाड्यांची आवक झाली असून 1800 क्विंटल माल उपलब्ध झाला आहे. सोबतच खडकी उपबाजारात 21 गाड्यांची आवक होऊन 300 क्विंटल माल उपलबद्ध झाला आहे. तर, उत्तमनगर उपबाजारात 9 गाड्याची आवक होऊन 150 क्विंटल माल उपलब्ध झाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली आहे.