पुणे - जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा परिसरात टेम्पो उलटून भीषण अपघात झाल्याची घटना रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण बचावला आहे.
अमोल बालाजी चिलमे (29 ), निवृत्ती उर्फ अर्जुन राम गुंडाळे (31), गोविंद नलवाड, (35), प्रदिप प्रकाश चोले (31), नारायण राम गुडांळे (27), अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत, तर बालाजी हरिश्चंद्र भंडारी, असे अपघातातून सुदैवाने वाचलेल्या व्यक्तीचे नाव असून तो किरकोळ जखमी आहे.
सर्वजण तीन मोटारसायकलवरून अलिबाग येथे गेले होते. अलिबागवरून तळेगाव येथे परतत असताना लघुशंकेसाठी थांबले. यावेळी लोणावळ्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि टेम्पो त्यांच्या अंगावर उलटला. टेम्पोमधील भरलेल्या गोणींखाली गुदमरून ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलीस आणि एका संस्थेच्या मदतीने अपघातग्रस्तांची मदत करण्यात आली.
दरम्यान, टेम्पोचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.